बुधवार, १९ जुलै, २०१७

हिंदू कोण – ३०

. हिंदूंतील पाप - पुण्य विचार
मागील भागातून पुढे
अशारितीने श्री भगवान कृष्ण, दैवी व आसुरी संपदा म्हणजे प्रवृत्ती कशा असतात ते सांगतात. सुरुवातीच्या भागात पुण्यकर्मी कसे वागतात ते दिले आहे व नंतरच्या भागात पापी लोक कसे वागतात ते दिले आहे. पापकारक हिंसेबद्दलची अधिक माहिती पुढे आहाराच्या भागात आलेली आहे ती पहावी. येथे श्रीकृष्णानी शास्त्राभ्यास करण्यास सांगितले आहे. हा शास्त्राभ्यास आहे पाप-पूण्य विचाराचा व त्याबद्दल आपण येथे थोडक्यात माहिती पाहिली आहे.

४५. निसर्गाच्या नियमानुसार न वागणे हेसुद्धा पाप समजले जाते हे एक आणखीन पापाचे कारण आहे. अनैसर्गिक लैंगिक संबंध पापकारक असतात. समलिंगी व्यवहार दोन पुरुषांतील असेल तर तो पापकारक असतो, परंतु, दोन स्त्रीयांतील असेल तर तो पापकारक ठरत नाही. सर्व प्रकारची व्यसने, मानसिक आणि दैहिक पापकारक असतात. ह्या व्यसनाबद्दलची चर्चा पुढे आली आहे. मदभाव (superiority complex) आणि मत्सरभाव (inferiority complex) व त्यामुळे जे कृत्य केले जाते ते पापकारक असू शकते. म्हणजे, स्वताला अति उच्च अथवा अतिनीच समजणे पापकारक असते. अशी कांहीं पापाबद्दलची कारणे दिली आहेत. ती सर्व टाळणे म्हणजे पुण्यमय जीवन असें समजता येईल. त्याशिवाय, मनुस्मृतीत तिचे पवित्र नियम न पाळणे हे ब्राह्मणांसाठी पापकृत्य आहे असें सांगितलेले आहे. कारण, सनातनी म्हणजे मनुस्मृतीतील पवित्र नियमांचे पालन करणारा असा अर्थ आहे. अर्थात् हे ब्राह्मणेतर हिंदूंना लागू नाही. पुण्य कशात असते ते शेवटी सामोपचाराच्या भागात दिले आहे. थोडक्यात सांगावयाच तर चांगुलपणाच्या सर्व गोष्टी पुण्यकारक असतात.
क्रमशः पुढे चालू
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू -४०
ज्या राज्यात शुद्र न्यायालय चालवतात राजा बघत बसतो ते राज्य, गांय जशी चिखलात फसते, तसें फसून जाते. २१
ज्या राज्यात शुद्रांची संख्या जास्त आहे, आस्तिक ब्राह्मणांचा अभाव आहे ते राष्ट्र भूकबळी रोंगांने नष्ट होते. २२
न्यायासनावर बसल्यावर ती वस्त्रं घातलेला आणि पालक दैवतांची प्रार्थना केलेला असा न्यायाधीश एक चित्ताने खटल्याचे कामकाज पाहिल. २३
योग्य अयोग्य जाणून तसेंच न्याय्य अन्याय्य ह्यांचें तारतम्य सांभाळून तो अशिलाची बाजू त्याच्या वर्णाच्या क्रमांनेएकून घेईल. २४
न्यायाधीश, बाह्य लक्षणांवरून माणसाच्या मनातील उद्देश समजून जसें त्याचा आवाज, त्याचं वर्ण (जात), त्याचे रुप, हावभाव, त्याच्या नजरेची चळवळ, शरीराची हालचाल, बोलण्याची पद्धत, उभे रहाण्याची ढब ह्यांवरून अंदाज करील. २५-२६
राजा द्विजाच्या लहान मुलांच्या मालमत्तेचे हक्क संरक्षित करील जो पर्यंत गुरुकुलांतून तो बाहेर पडत नाही, अथवा वयांत येत नाही. २७
त्याच प्रमाणे, अविवाहीत, निपुत्रिक, दिवंगत पतिच्या प्रामाणिक विधवा, जिचे कोणीही नातेवाईक नाहीत आणि रोगजर्जर महिला ह्यांच्या हक्काचे संरक्षणसुद्धा राजा करील. २८
न्यायी राजा स्त्रीच्या मालमत्तेचे अपहरण करणार्याला चोर ठरवून त्या प्रमाणे शिक्षा करील. २९
जर एकाद्या जमिनीचा मालक गैरहजर असेल तर राजा ती जमीन तीन वर्षे सुरक्षित ठेवील जर तो तीन वर्षात आला तर ती जमीन त्याला देईल पण त्या सुमारास आला नाही तर ताब्यात घेऊन वापरेल अथवा कोणाला देईल. ३०
जर एकादा माणूस म्हणाला किं, ही वस्तु माझी आहे तर त्याची चौकशी करावी त्याने त्याची सविस्तर माहिती दिली तर तो खरा मालक आहे असें समजून ती वस्तु त्याला द्यावी. ३१
परंतु, जर त्याला त्या वस्तुचे वर्णन करतां आले नाही जसें रंग, आकार, हरवली ती जागा, इत्यादी, तर त्याला त्या वस्तुची किंमत, एवढा दंड त्याला मारून मग ती वस्तु द्यावी. ३२
राजा प्रामाणिक माणसांचा मान राखण्यासाठी ज्याला ती वस्तु मिळाली त्याला त्या वस्तुच्या किंमतीच्या बारावा, दहावा, अथवा सहावा भाग बक्षिस म्हणून देईल. ३३ टीपः ही रक्कम वस्तुच्या मालकाकडून वसुल केली जाईल.
जर वस्तु राजाच्या सेवकास मिळाली तर ती वस्तु राजाच्या खास अधिकार्याच्या निगराणीत सुरक्षित प्रकारे ठेवली जाईल. परंतु, जर त्या सेवकांने ती वस्तु स्वताकडे ठेवली तर त्या सेवकाला चोर ठरवून त्या आरोपाखाली शिक्षा होईल. त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडले जाईल. ३४
जर एकाद्याने शपथेवर सांगितले किं, ही वस्तु माझी आहे तर राजा त्याला त्या वस्तुच्या किंमतीच्या सहावा भाग अथवा बारावा भाग एवढा दंड मारून शकतो त्यानंतर ती त्याला दिली जाईल. ३५ टीपः ह्याचा अर्थ आपली वस्तु हरवणे हासुद्धा दंडपात्र गुन्हा आहे असें मनुस्मृती मानते.
जर मालकी बाबत खोटा दावा केला तर त्याच्या मालमत्तेच्या आठवा हिस्सा एवढा दंड त्याला भरावा लागेल. ३६
जर ज्ञानी ब्राह्मणास एकादी वस्तु मिळाली तर तो ती राजाच्या खजिन्यात देऊ शकतो. अथवा स्वतः ठेवू शकतो. कारण, सर्वकांही ब्राह्मणाचेच असते! ३७
जेव्हां राजाला गुप्त खजिना मिळतो तेव्हां तो त्यातील अर्धा भाग ब्राह्मणाला देतो उरलेला भाग स्वताच्या खजिन्यात जमा करतो. ३८
राज्याचे संरक्षण करीत असतांना जर राजाला मातीत कांहीं प्राचीन संपत्ती मिळाली (सोने वगैरे) तर त्यातील अर्धा भाग तो त्याच्या खजिन्यात जमा करील उरलेला ब्राह्मणांना देईल. राजा सर्व राज्यातील मातीचा धनी असतो. ३९
चोरांने पळवलेली मालमत्ता राजांने त्या गोष्टीच्या मालकांस (तो कोणत्याही जातीचा असो) द्यावी जर ती राजांने स्वतःकडे ठेवली तर राजा चोरीचा दोषी ठरतो. ४०

मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

मंगळवार, ११ जुलै, २०१७

हिंदू कोण – २९

. हिंदूंतील पाप - पुण्य विचार
मागील भागातून पुढे –
४३. हिंसा व हत्या ह्यांत नेहमी गोंधळ केला जातो त्यासाठी त्यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. हत्या करणे म्हणजे, ठार मारणे. ठार मारण्याच्या क्रियेत वेदनेचा समावेश असेलच असें नाही. हत्या विनावेदना होऊ शकते. जर विनावेदना हत्या केली तर ते पाप ठरत नाही. ही एक महत्वाची माहिती आहे, कारण गीतेत श्री कृष्णाने अर्जुनास कौरवांना ठार मारण्याचा आदेश दिला होता. जर हत्या करणे पापकारक असते तर निश्र्चितच श्री कृष्णाने अर्जुनांस हत्या करण्याचा आदेश दिला नसता. ह्या ठिकाणी पाप करण्या मागील उद्देश महत्वाचा असतो. प्रत्यक्ष कृतीपेक्षा त्या मागील उद्देश त्यात पाप आहे कां नाही ते ठरवत असतो. उद्देश नसतांना जर पाप सदृष्य कृत्य झाले तर ते पाप समजले जात नाही. पापकारक कृत्ये कोणती त्या बद्दल गीतेत सोळाव्या अध्यायात दैवी संपदा (पुण्यकारक संपदा) व आसुरी संपदा (पापकारक संपदा) सांगितल्या आहेत. त्या पाहाव्या लागतील. त्याशिवाय, मनुस्मृतीत सांगितलेला, "जीवोजीवस्य जीवनम्", ह्या नियमानुसार खाण्यासाठी प्राणी मारण्याची परवानगी हिंदूंना आहे. तसेंच स्वसंरक्षणासाठी, उपद्रवकारक असेल तर (उंदीर, डांस, रोगजंतु वगैरे) मारण्याची मुभा असते त्यामुळे पाप लागत नाही. मजेसाठी अथवा खाण्याव्यतिरीक्त इतर कारणांसाठी जसें, शिकार करणे पापकारक असते.
४४. गीतेतील सोळाव्या अध्यायाचे मराठी भाषांतर येथे दिले आहे ते पहावे.
श्री भगवान सांगतात, निर्भयता, पूर्ण सात्त्विक प्रवृत्ति, ज्ञान व कर्मयोग या दोहोंविषयी तारतम्यानें व्यवस्था, दान, इंद्रिय निग्रह, यज्ञ (नेमून दिलेले कार्य), स्वधर्माप्रमाणे आचरण, तप, सरळपणा, अहिंसा, सत्य, क्रोध नसणे, त्याग, शांति, मनांत दुष्टबुद्धि नसणे, प्राणिमात्रांविषयी दया, निर्लोभता, नम्रता, वाईट कृत्याविषयी जनलज्जा, नको ते उद्योग न करणे, तेजस्विता, क्षमा, मनाची शुचिर्भूतता, कोणाचाही द्रोह न करणे, असें हे सद्गुण हे अर्जुना, दैवी संपत्ति घेऊन जन्माला आलेल्या सत्पुरुषांस प्राप्त होतात. टीपः अशा माणसास पुण्यवान माणूस असें म्हणतात. ह्याठिकाणी पुरुष हा शब्द लैंगिक अर्थाने वापरलेला नसून व्यक्ति ह्या अर्थानें योजलेला आहे. म्हणून तो स्त्री व पुरुष अशा दोनही अर्थाने समजावा. ही लक्षणे सज्जन माणसाची समजता येतील.

हे अर्जुना, आसुरी संपत्ति घेऊन जन्मलेल्याच्या अंगी दांभिकपणा, दर्प, दुराभिमान, क्रोध, निष्टुरता आणि परमेश्र्वराबद्दलचे अज्ञान हे दुर्गुण आढळून येतात.
दैवी सद्गुण मोक्षप्राप्तीला आणि आसुरी दुर्गुण (कर्म) बंधनाला कारणीभूत असतात. तूं दैवी संपत्तिसाठी जन्मलेला आहेस, म्हणून तूं (पांण्डवा) हा शोक टाकून दे.
हे अर्जुना, ह्या लोकी दैवी आणि आसुरी असें दोन प्रकारांचें प्राणी उत्पन्न होतात. त्यातल्या दैवी प्रकाराचे वर्णन मी तुला सविस्तरपणे सांगितले. आतां आसुरी प्रकाराचे वर्णन ऐक.
आसुरी स्वभावाच्या लोकांना, प्रवृत्ति म्हणजे काय करावे व निवृत्ति म्हणजे काय करू नये, हे समजत नाही. त्यांच्या ठिकाणी शुचिर्भूतपणा, सदाचार आणि सत्य ही नसतात. टीप: ह्याचा अर्थ, आसुरी स्वभावाची माणसे तामसी असतात; व त्याच्याही खालच्या थरातील म्हणजे दुर्गुणी असतात. सत्त्व, रजस् व तमस् ह्या त्रिगुणांशिवाय सत्त्व गुणापेक्षा वरचा असा संत गुण व तमस् गुणापेक्षा खालचा असा दुर्गुण असे एकंदर पांच गुण, मार्ग तत्त्वज्ञानात दिले आहेत.
आसुरी स्वभावाचे लोक म्हणतात किं, हे जग असत्य, निराधार, ईश्र्वररहित, एकमेकांपासूनही न निर्माण झालेले (द्वैतवाद), म्हणून (मनुष्याच्या) उपभोगासाठी उत्पन्न झालेले व त्या खेरीज त्याचा दुसरा कांहीं हेतु नाही.
अशाप्रकारच्या विचारसरणीचा आश्रय करून हे नष्टात्मे, अल्पबुद्धि, क्रूर, घातकी, जगाच्या नाशासाठी उत्पन्न होतात.
अहंमन्यता व उन्मत्तपणा यानीं पछाडलेले व अशुद्ध आचार-विचार अंगिकारलेले ते आसुरी लोक, मोहामुळे भलतेंच वेडेपणाचे बेत मनांत योजून पापकारक कामें करण्यास प्रवृत्त होतात.
इंद्रियांच्या इच्छातृप्ति एवढाच काय तो जीवनाचा उद्देश आहे असें मनाशी पक्के समजून (आत्म्याला विसरलेले, फक्त जीव आहे असे मानणारे) वागणारे हे आसुरी लोक जगांत प्राप्तव्य काय ते हेंच असें मानून, शेकडों इच्छांच्या पाशांत अडकलेले, कामक्रोधांनी व्यस्त झालेले असें ते आसुरी लोक आपल्या कामोपभोगांसाठी अन्याय न्याय ह्यांची तमा न बाळगतां अनेक मार्गांने धन संपत्ती मिळवण्याची हांव धरतात.
आज मी हे मिळविले, उद्या माझा तो मनोरथ प्राप्त करून घेईन, इतके द्रव्य मजपाशी आज आहे, पुनः तेही माझे होईल, हा शत्रु मी आज लोळवला, दुसरा शत्रुसुद्धा मी ठार मारीन, मी सत्ताधीश, मी सुखे भोगणारा, मींच सिद्ध, मींच बलाढ्य, म्हणून सुखी, मी श्रीमंत व म्हणून कुलवंत, माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ (माझे काम मींच ठरविन) करीन, मींच दाने करीन, मींच चैन करीन अशा अज्ञानांत मोहित झालेले, अशा नाना प्रकारच्या भ्रमांनी ग्रासलेला, मोहाच्या (अज्ञानाच्या) जाळ्यात पूर्णपणे अडकलेला आणि इंद्रियांच्या विषयभोगांत लंपट झालेला, आसुरी स्वभावाचा मनुष्य अखेरीस अमंगळ अशा नरकांत पडतो.
स्वःची बढाई मारणारे, गर्वांने ताठरलेले, संपत्ति व मान यांनी मदोंमत्त झालेले हे आसुरी वृत्तीचे लोक केवळ ढोंगीपणांनें शास्त्रविधी सोडून केवळ नांवापुरते यज्ञ करतात. असे लोक आसुरी दैवतांची (दैत्य, दानव, राक्षस इत्यादि) आराधना करतात व परमेश्र्वराला विसरतात. प्रसंगी ते स्वतःलाच देव समजतात. मी भूदेव, अशी वल्गना करण्यास धजतात.
अहंकार, शक्तिचा गर्व, उन्मत्तपणा, विषयवासना, रागीटपणा, ह्या दुर्गुणांनी भरलेले मत्सरी स्वभावाचे हे लोक आपल्या व इतरांच्या देहांत वास करणार्या माझा (परमेश्र्वराचा) द्वेष करणारे व माझे निंदक होतात. द्वेष व अहंकार ह्यांने उन्मत्त झालेले हे नराधम शेवटी नरकांत जातात.
त्या ईश्र्वरद्रोही, क्रुरकर्मा, घातकी नराधमांना मी संसारातील आसुरी म्हणजे, पापयोनींत टाकून देतो.
हे कुंतीपुत्रा, याप्रमाणे जन्मोजन्मी आसुरी कोटीला प्राप्त झालेले ते मुर्ख लोक माझी प्राप्ती कधींच न करतां अखेरीस अधोगतीच्या नरकांत जातात.
अतिकाम, अतिक्रोध व अतिलोभ असें तीन प्रकारचें नरकाचे द्वार असून ते आत्मविधातक असते म्हणून, या तिघांचा त्याग करावा.
अरे कौंतेया, या तीन नरकद्वारांपासून विमुक्त झालेला मनुष्य स्वतःचे कल्याण ज्यात आहे तेंच आचरतो व त्याद्वारा तो श्रेष्ठ गतीला जातो.
जो शास्त्रोक्त विधि सोडून मनसोक्त वर्तन करतो त्याला सिद्धि, सुख, उत्तमगती हे प्राप्त होत नाहीत.
म्हणून कर्तव्य व अकर्तव्य ह्यातील फरक समजण्यासाठी तुला शास्त्राभ्यास हेंच प्रमाण मानले पाहिजे. तुला या लोकी शास्त्राभ्यास करणे आवश्यक आहे. गीतेचा सोळावा अध्याय संपला.
पुढे क्रमशः चालू –

मनुस्मृती आठवा भाग सुरू – -२०
न्यायदानाचे काम करण्यासाठी राजा न्यायालयात पूर्ण ऐश्र्वर्यानीशी प्रवेश करील. त्याच्या बरोबर त्याचे ज्ञानी ब्राह्मण आणि अनुभवी सल्लागार असतील.
स्वताच्या वस्त्राचा देखावा न करतां तो त्याचा उजवा हात उंच करून उभ्याच अथवा बसून त्या दिवसाच्या कामाचा आढावा घेऊन कामाला सुरुवात करील.
दररोज एकामागोमाग एक खटले जे अठरा कायद्यांच्या अखत्यारीत येतात व स्थानिक परंपरेनुसार योग्य ठरतात आणि पवित्र नियमांनुसार आहेत ते असें,
अठरा कायदे असें, ) कर्जाची परतफेड न करण्याबाबतचा, ) ठेवी व गहाणवटी, ) मालकी नसतांना विक्री करणे, ) भागीदारीतील वाद, ) दान (बक्षिस, भेटवस्तु) बाबत,
) पगार न देण्याबाबत, ) करार मोडण्या बाबत, ) विक्री व खरेदी मोडण्याबाबत, ) मालक व नोकर ह्यांतील वाद,
१०) जमिनीच्या सीमेबाबतचे वाद, ११) हल्ला, मारामारी, १२) बदनामी करण्याबाबत, १३) चोरी, १४) दरोडा व दंगाधोपा करण्याबाबत, १५) भेसळ,
१६) पति-पत्नीतील वाद, १७) वारसांबाबत, १८) जुगार व सट्टा खेळम्याबाबत, ७ टीपः अनैतिक संबंधाबाबत गुन्हा ह्यांत नोंदलेला नाही, म्हणजे, असें संबंध गुन्हा समजला जात नव्हता.
नैसर्गिक न्यायाच्या प्रमाणे, तो (राजा) ह्या प्रकारच्या खटल्यात गुंतलेल्यांवर खटला चालवेल.
जर कांहीं कारणांने राजा न्यायालयाचे काम करणार नसेल तर तो त्यासाठी ज्ञानी ब्राह्मणांस नियुक्त करील.
वकील त्याच्या तीन सहायकांसह न्यायालयात प्रवेश करील. आणि राजापुढे सर्व आलेल्या खटल्यांचा विचार बसून अथवा उभ्या करील. १०
तेथे तीन वेदसंपन्न ब्राह्मण आणि एक राजाने नेमलेला न्याय शास्त्रपारंगत असा न्यायाधीश असेल, त्यालाच चार ब्राह्मणांचे न्यायालय असें म्हणतात. ११
जेथे अन्यायाच्या बाणाने न्याय व्यवस्था जखमी झाली आहे तेथे जर न्यायाधीशांनी ती जखम योग्य न्याय देऊन भरून काढली नाही तर सर्वच अन्यायाने जखमी होतील. १२
एकतर न्यायालयात जाऊ नये किंवा सत्य बोलावे, कांहींच न बोलणारा व खोटे बोलणारा असें दोघेही पापी असतात. १३
जेथे न्यायाचा नाश अन्यायाने होतो व सत्य खोटेपणांने संपते आणि असें होत असतांना न्यायाधीश तोंड बघत बसतो तेथे अखेरीस त्याचासुद्धा नाश होतो. १४
न्यायाचे उल्लंघन केल्याने न्याय नष्ट होतो, न्याय राखल्यास राखला जातो म्हणून, न्यायाचे उल्लंघन होता कामा नये. कारण, त्यामुळे पसरणारा अन्याय सर्वांना नष्ट करतो. १५
दैविक न्यायाला वृष म्हणतात, जो माणूस त्याला मारतो त्याला देव वृषल म्हणजे शुद्र म्हणतात. १६
माणसाचा करा मित्र असतो न्याय, तो त्याला मरणानंतरसुद्धा साथ देतो, जेव्हां सर्वस्व लयाला गेलेले असते. १७
जेव्हां अन्याय होतो तेव्हां त्यातील पापाचा चौथा भाग अन्याय करणार्याचा असतो, चौथा भाग तो पहाणार्याचा (साक्षीदार) असतो, चौथा भाग तेथे डोळेझाक करणार्याचा असतो व उरलेला चौथा भाग राजाचा असतो. १८
परंतु, जेव्हां गुन्हागाराला योग्य शिक्षा होते तेव्हां इतर तीन मुक्त होतात कारण, सर्व पाप त्या गुन्हेगारास भोगावे लागते. १९
ब्राह्मण जातीची असेल किंवा तो स्वताला ब्राह्मण म्हणवून घेत असेल व त्याची खरी जात कोणालाही माहीत नाही तर असा माणूल राजाच्या कृपेने स्वताचा खटला स्वता चालवू शकतो. पण शुद्र असेल तर तो कधीही स्वताचा खटला चालवू शकत नाही. २०
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.