शनिवार, ३० मे, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा-५

मागल्या भागाकडून पुढे चालू

जेव्हा परमेश्र्वर (स्वयंभु) जागा होतो तेव्हा जगसुद्धा जागृत होते जेव्हा तो झोपतो तेव्हा तेसुद्धा झोपते. ५२
जेव्हा परमेश्र्वर झोपतो तेव्हा सर्व सचेतन सृष्टी त्यांची मनंसुद्धा आपली कामं थांबवून स्तब्ध होत असतात. ५३
जेव्हा सृष्टी स्वयंभुमध्ये विलीन होते तेव्हा स्वयंभु जो ह्या सृष्टीचा कर्ता आहे तो समाधीमध्ये शिरतो. ५४
जेव्हा तो आत्मा अज्ञानरुपी अंधारात शिरतो तेव्हा तो इंद्रीयांत रमतो व आपले मुळ स्वरुप व कार्य विसरतो, पुन्हा इंद्रीये सोडतो, असे होत रहाते. ५५
तो सुक्ष्म स्वरुपात झाडांच्या बियांत शिरतो, आणि पुन्हा नवीन वनस्पतीत रहातो. ५६
अशारितीने, तो नश्र्वर, आलटून पालटून जागृती व निद्रा अशा अवस्थात जात चल व अचल सृष्टी उत्पन्न करतो व मारतो. ५७
स्वयंभुने जग चालवणारे पवित्र नियम तयार केले व प्रथम भृगुला शिकवले, त्यानंतर ते नियम भृगुने मरीकी व इतर ऋषीना शिकवले. ५८
भृगु प्रसन्न होऊन मनुच्या विनंतीचा मान राखून सृष्टीचे नियम शिकवण्यास तयार झाला. ५९
मी भृगु, आता हे पवित्र नियम सर्व ऋषीना पूर्णतया सांगणार आहे, ऋषीमुनीनी हे संपूर्ण नियम माझ्याकडून शिकून घ्यावेत. ६०
सहा अति श्रेष्ठ बुद्धि असलेले मनु, जे स्वयंभु परमेश्र्वराने त्याच्या विचाराने उत्पन्न केले व ज्यांनी नंतर ही सृष्टी उत्पन्न केली, त्यांची नांवे अशी आहेत. ६१
स्वरोकिष, औत्तमी, तमसा, रैवत, कक्षुष आणि मनु असून ते अति तेजस्वी होते. जे विस्वताचे पुत्र होते. ६२
ते सात मनु, विवस्वत धरून, ज्यानी त्यांच्या सामर्थ्याने सर्व सजीव व निर्जीव सृष्टी उत्पन्न केली व जे त्यांना आखून दिलाली कामे दिलेल्या कालखंडात करीत रहातील. ६३
काळ मोजण्यासाठी, अठरा निमिषाचा एक कशस्थ, तीस कशस्थाचा एक काळ, तीस काळाचा एक मुहुर्त, अशा अनेक मुहुर्तांचा दिवस व रात्र असे ठरले. ६४
सुर्य दिनाचे दिवस व रात्र असे दोन भाग करतो, ६५
जगाचा एक महीना पितरांचा एक दिवस असतो, कृष्ण पक्षाचे पंधरा दिवस रात्र असते व शुक्ल पक्षाचा पंधरा दिवस पितरांचा दिवस असतो. ६६
मनुस्मृती प्रमाणे अनेक मनु उत्पन्न झाले आहेत व त्यांच्या व्यवस्थापनाने हे जग चालते असे दिले आहे.

पुढील पोस्ट मध्ये चालू

माझा इमेल ashokkothare@gmail.com

ह्या इमेल वर तुम्ही संपर्क करु शकता.

बुधवार, २० मे, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा-४

मागल्या भागाकडून पुढे चालू

विरागने तीव्र तपस्येच्या मदतीने हे जग उत्पन्न केले, हे तुम्ही सर्व ऋषी जाणून घ्याल तर ते बरे होईल. ३३
त्यानंतर मी अति अवघड तपस्या करून दहा ऋषी उत्पन्न केले. ज्याना मी ह्या जगाचा कारभार पहाण्यास नेमले. ३४
त्यांची नांवे अशी, मरिची, अत्री, अंगिरस, पुलस्य, पुलह, क्रातु, प्रकेतस, वशिष्ठ, भृगु आणि नारद. ३५
ह्या दहा ऋषींनी नंतर सात मनु, तेजस्वी सामर्थ्यवान दैवते आणि ऋषी उत्पन्न केले, त्यांचे सामर्थ्य अमर्याद होते. ३६
त्या बरोबर यक्ष, गंधर्व, राक्षस, पिशाच्च, अप्सरा, असूर, नागदेवता, सूपर्ण असंख्य पितर (आदिदैवते) उत्पन्न झाली. ३७
अशा सर्वांच्या प्रभावातून नैसर्गिक प्रपात जसे, विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अस्पष्ट स्पष्ट दिसणारे इंद्रधनुष्य, अशनि, अद्भूत आवाज, अनेक प्रकारचे दैवी आवाज प्रकाश अशा विविध गोष्टी तयार होऊ लागल्या. ३८
घोड्याचे तोंड असलेले किन्नर, विविध प्रकारची माकडे, मासे, मांसाहारी शाकाहारी पक्षी, पशु, विविध प्रकारची माणसे, त्यानंतर उत्पन्न झाली. ३९
लहान मोठे किडे, किटक, डांस, इत्यादी सुक्ष्म जीव तयार झाले. अशारितीने सर्व सजीव सृष्टी उत्पन्न झाली. ४०
विरागने उत्पन्न केलेल्या ऋषी, मुनी, तपस्वी ह्यांच्या मदतीने तयार झालेल्या ह्या सृष्टीचा कारभार पहाण्यास मी (मनु) माझ्या मर्जीनुसार सुरुवात केली. ४१
सृष्टीत निर्माण होणार्या विविध प्राण्यांच्या उत्पत्तिची तर्हा मी निश्चित केली. ती अशी, ४२
प्रथम शाकाहारी मांसाहारी प्राणी उत्पन्न झाले. त्यानंतर राक्षस, पिशाच्च माणसे गर्भातून निपजली. ४३
अंड्यातून उपजणारे मांसे, पक्षी, सरपटणारे, कासव इत्यादी उत्पन्न केली. ४४
उष्ण दमट परिस्थितीत उपजणारे बारीक किटक उपजू लागले. ४५
त्यानंतर बीजांतून उपजणारी वनस्पती तयार झाली. ४६
ज्या, फुलाशिवाय फळे देतात त्यांना वनस्पती असें म्हणतात.
ज्या, फुलाशिवाय फळे देतात त्यांना वनस्पती असें म्हणतात आणि ज्या फुलाने फळे देतात त्यांना वृक्ष असे समजतात. अनेक फांद्या मुळं असलेली गवतें, वेल, ही छाटण्यांतून उत्पन्न होणारी त्यात आली. ४७-४८
अशा सर्व एकाच जागी रहाणार्या जीवांना म्हणजे वनस्पतींना, जगण्यासाठी अंधाराची गरज असते, त्यांना त्यातून आनंद, दुःख, कळा, वेदना, प्रेम इत्यादी भावना सुप्तपणे होत असतात. ४९
जन्म-मरणाच्या परिचक्रात पहिला ब्राह्मण असतो शेवटी झाडे असतात. ५०
अशारीतीने सृष्टी उत्पन्न केल्यावर तो विश्वकर्मा स्वतामध्ये विरून जातो. एका युगातून दुसरे युग त्यामुळे उत्पन्न होत असते. ५१
मनुस्मृतीत मनुला विशेष महत्व दिलेले असले तरी त्याची निर्मिती स्वयंभू आहे असे सुद्धा सांगितले आहे. येथे स्वयंभू म्हणजे स्वत:च्या विचारांतून निर्माण झालेला असा होतो. स्वयंभू हा शब्द परमेश्वर अशा अर्थाने वापरलेला आहे. मनुस्मृतीत जीवसृष्टीच्या निर्मितीचा क्रम जो दिला आहे तो आधुनिक ज्ञानात मान्य असलेल्या क्रमापेक्षा वेगळा आहे. आधुनिक ज्ञानात मान्य असलेल्या क्रमात सुरुवातीला सुक्ष्म जीव त्यातून मोठे जीव अशी निर्मिती होते असे दिले आहे. त्या उलट मनुस्मृतीत सुरुवातीस मोठे नंतर सुक्ष्म असा क्रम दिला आहे. प्राण्यांची निर्मिती आधी दाखवली आहे त्यांच्या खाद्याची त्यानंतर झाली असे दाखवले आहे. वस्तुतः सुरुवातीला खाद्य नंतर खाणारा अशी उत्पत्ती दाखवली पाहिजे तसे नाही म्हणजे, मनुस्मृतीत तर्कशुद्धता नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
पुढील पोस्ट मध्ये चालू

माझा इमेल ashokkothare@gmail.com

ह्या इमेल वर तुम्ही संपर्क करु शकता.

शनिवार, १६ मे, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा-३

मागील भागा कडून चालू -
२२) विश्व निर्मात्याने त्याच बरोबर अनेक इतर दैवते निर्माण केली. त्यांचे कार्य त्याना नेमून दिले. त्या दैवतांचे खाद्य प्रसाद सुद्धा निष्चित केले.
२३) त्या दैवतांतून अग्नि, सूर्य आणि वायू पासून ऋक्, यजु साम हे तीन वेद त्याने उत्पन्न केले. असे करण्याचे कारण त्या त्या दैवतांचे पुजन कसे करावे ते समजावे. ह्याचा अर्थ अथर्ववेद वैदिक परंपरेतील नाही. अथर्ववेदाचा साधा उल्लेखसुद्धा मनुस्मृतीत नाही हे विशेष आहे.
२४) काळ त्याचे भाग, चंद्राच्या कळा, ग्रह त्यांचे फिरणे, नद्या व त्यांचे वाहणे, पर्वत, सपाट आणि उबडखाबड जमिनी तयार केल्या.
२५) तत्वशिलता म्हणजे वैचारिक शिस्त, वाचा, आनंद, क्रोध, इत्यादी वृत्ति उत्पन्न केल्या.
२६-२७) तसेंच योग्य काय अयोग्य काय हे ठरवून त्यांचे परिणाम सुद्धा निष्चित केले. अशारितीने हे जग तयार झाले.
२८) विश्वनिर्मात्याने जसे नियम केले कामाचे क्रम आखून दिले त्यानुसार हे जग काम करीत असते तसेंच करीत राहील. पदार्थ विज्ञानाचे, रसायन शास्त्राचे असे विविध शास्त्राचे नियम निष्चित केले आहेत ते त्या प्रमाणेच रहाणार असे झाले.
२९) चांगुलपणा, वाईटपणा, त्रासदायकपणा, सज्जनपणा, पुण्यवंत, पापमय, असे काही गुण अवगुण त्या त्या मध्ये विश्वनिर्मात्याने जसे घातले तसे ते बनले.
३०) निसर्गाच्या सर्व व्यवहाराचे क्रम त्यानुसार आखून दिले गेले.
३१) परंतु जगाच्या भल्यासाठी मनुष्य मात्र असा बनवला किं, त्यातील हे सर्व गुण अवगुण तो माणूस बदलू शकत होता. त्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र त्याने त्याच्या शरीरातून क्रमशः तोंड, हात, मांडी पाय ह्यांमधून उत्पन्न केले. ह्याचा अर्थ इतर सजीव त्यांचे गुण बदलू शकत नाहीत. घोडा गाढवा सारखा वागू शकत नाही, कोल्हा बैलासारखा वागू शकत नाही, गुलाबाच्या झाडाला आंबा लागणार नाही किंवा नारळाला केळी लागणार नाहीत इत्यादी.
ह्याचा अर्थ मनुस्मृतीच्या काळात वर्ण जन्मानुसार होते.
३२) अखेरीस त्याने स्वताच्या देहाचे नर नारी(मादी) असे दोन भाग केले. त्यातील स्त्रीतून विराग उत्पन्न केला.

वर दिलेल्या ३१व्या वचनात जे दिले आहे त्यावरून मनुस्मृती वर्णव्यवस्था जन्मावर आधारीत झाल्यानंतरच्या काळातील आहे हे स्पष्ट होते. मुळभूत सनातन धर्मानुसार चार वर्ण गुणकर्मानुसार असतात. जन्मपत्रिकेतसुद्धा त्या माणसाचा वर्ण दिलेला असतो. महाभारत काळात वर्ण व्यवस्था गुणकर्मानुसार होती ते पुढे राहीले नाही. म्हणजे, एकाच कुटूंबातील निरनिराळ्या व्यक्ति वेगवेगळ्या वर्णात असल्याचे दिसून येते. हे झाले सनातन धर्माचे परंतु, ब्राह्मण धर्मामध्ये एका कुटूंबातील सर्व त्या कुटूंबाच्या जातीचे असे धरले जाते. सनातन धर्म व ब्राह्मण धर्म ह्यात हा मोठा फरक असल्याचे आढळते. चालु हिंदू मान्यतेनुसार वर्ण व्यवस्था वापरात नाही त्या ऐवजी जाती व्यवस्था आहे. प्रचलित हिंदू मान्यता, सनातन आणि ब्राह्मण धर्म ह्यातील हे फरक लक्षात घेण्यासारखे आहेत. ह्याचा अर्थ असा होतो कीं, वर्ण आणि जाती हे एकच नाहीत. असे असले तरी हे दोन शब्द एकाच अर्थाने नेहमी वापरले जातात असे दिसून येते. अशामुळे बराच गोंधळ पसरला आहे असे दिसते. मनुस्मृतीत वेदातील वर्ण आणि नंतरच्या जाती ह्यात गोंधळ केलेला असल्याचे स्पष्टपणे दिसते. ह्यावरून असे समजता येईल किं, ज्या काळात वर्ण व जाती ह्या दोनही एकाच वेळी कार्यरत होत्या त्या काळात मनुस्मृती लिहीली गेली असावी. अशा कारणाने बरेच प्रश्न आज सगळ्यांना त्रास देत आहेत. ब्राह्मण जातीतील लोक ह्या गोंधळाचा भरपूर उपयोग करीत आहेत असे म्हणावे अशी आज परिस्थिती झालेली आहे.
पुढील पोस्ट मध्ये चालू

माझा इमेल ashokkothare@gmail.com

ह्या इमेल वर तुम्ही संपर्क करु शकता.