रविवार, २२ जानेवारी, २०१७

हिंदू कोण – १४

. देवांच्या अस्तित्वा बाबत
२१. वैदिक हिंदू धर्माचा इतिहास पाहिला तर असें दिसते किं, ऋग्वेदाच्या काळात देवतांच्या (पितरांच्या) पुजा अगदी साध्या सोप्या होत्या परंतु, पुढे शुक्ल यजुर्वेदाच्या काळात त्या बर्याच मोठ्या व्यापक झाल्याचे आढळते. विशेष करून याज्ञवल्क्याच्या काळात हे जास्त वाढल्याचे आढळते. याज्ञवल्क्याने यजुर्वेदातील शुक्ल हा भाग लिहीलेला आहे. ह्याचे कारण, त्या काळात पौरोहित्याचा धंदा फार मोठ्या प्रमाणात वाढला होता. तो एवढा वाढला होता किं, त्याला कर्मकांड (कर्मकांड हा शब्द यज्ञयागांबद्दलची तुच्छता दाखवणारी संज्ञा आहे) म्हणण्याची पाळी आली. दोन मिनीटांत उरकता येणार्या विधींचा पसारा ह्या ब्राह्मणांनी एवढा वाढवला किं, अशा पुजा दिवसभर होत राहिल्या. ह्याचे कारण उघड आहे, जेवढी मोठी पुजा तेवढी दक्षिणा जास्त. इतक्या ब्राह्मणांना जेवण द्या, एवढे दान करा अशा मागण्या पुरोहितांनी करून हा ब्राह्मणी धंदा भरपूर वाढवला आहे. सामान्य भक्तांचे ह्या विषयाचे ज्ञान जुजबी असल्याने हे सर्व विनासायास होत आहे, आणि हे असें आजतागायत चालू आहे.

एकदा एकाद्या गोष्टीचा धंदा झाला किं, त्याचे स्वरूप सर्वभक्षक होते तसेंच ब्राह्मणकाळात झालेले दिसते. अशारीतीने ब्राह्मणांनी हिंदूधर्माचे धंदेवाईक स्वरूप उभे केले ते आज आपण पहात आहोत. मनुस्मृतीतून ब्राह्मणांनी स्वतःचे महत्व कसें वाढवले होते ते समजते. ब्राह्मणांच्या ह्या सर्वभक्षक कारभारावर समर्थ रामदास स्वामींनी लक्ष वेधून ब्राह्मणांना ताकीद दिली होती किं, त्यांनी हे व्यवहार आटोपते घ्यावेत नाहीतर त्याचा नाश होईल. तरीसुद्धा ब्राह्मणांचा सर्वभक्षक कारभार तसांच चालू राहिला आहे. त्यापुढे जाऊन ब्राह्मणांनी स्वताला भूदेव म्हणून घेण्यास सुरुवात केली देव म्हणजे जणुकाय त्याच्या दारात बांधलेले कुत्रे आहे किं काय अशी शंका येऊ लागेल. अशारितीने हे ब्राह्मण त्यांच्या काल्पनिक देवापेक्षा मोठे झाले. ते इतके किं, कांहीं प्रसंगी पुरोहित देवाची भिती दाखवून भित्र्या अनुयायांना लुबाडतात असें सुद्धा आढळते.
२२. आज परिस्थिती पहाता, आता विज्ञानकाळ सुरु झाला ब्राह्मण काळ (अथवा पुरोहित काळ) संपुष्टात येण्याची वेळ आली आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. हे केवळ हिंदूंमध्ये होत आहे असे नसून सर्वच धर्मांतील पुरोहितांना त्या त्या धर्मातील अनुयायी विविध प्रश्र्न विचारू लागले आहेत. विज्ञान काळात प्रश्र्न विचारणे हे एक मुलभूत कार्य झाले आहे. सर्वच धर्मातील जिज्ञासु मंडळी जेव्हा कळीचे प्रश्र्न विचारू लागले तेव्हा हा सत्ताधारी पुरोहित वर्ग संतापून प्रश्र्न विचारणार्यांस हरप्रकारे त्रास देऊ लागला. जाती बाहेर काढणे, बहिष्कार टाकणे, मारून टाकणे, खोटेनाटे आरोप करणे, छळ करणे असे अनेकविध उद्योग सुरु झाले, रोमन कॅथोलिक चर्च शंकराचार्यानी विरोधकांना जीवंत जाळल्याची उदाहरणे आहेत. प्रश्र्न विचारणार्यांच्या मुस्कटदाबीचा कहर झाला पण कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही, तसेंच प्रश्र्न विचारणे चालूच राहिले. कालांतराने प्रश्र्न विचारणार्यांची जीत झाली पुरोहित वर्ग बाजूला झाला. विज्ञानाचा विजय झाला. आता ह्या सुधारलेल्या परिस्थितीत आपण धर्माचा शास्त्रशुद्ध अभ्यास करीत आहोत त्यामुळे परमेश्र्वर कृपाळु, दयाळु, क्षमाशिल नसल्याचे लक्षात आले आहे. जेव्हा वैज्ञानिक दृष्टीने धर्माच्या संकल्पनांचा अभ्यास सुरु झाला तेव्हा इस्लाम पोपचा (म्हणजे चर्चचा, म्हणजे त्या पुरोहितांचा) ख्रिस्तीधर्म भ्रामक कल्पनांवर आधारीत असल्याचे स्पष्ट झाले. खरा हिंदू विचार मात्र त्या परीक्षेतून सहीसलामत पार झाला.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृतीचा सहावा भाग सुरू – ५१ – ७०
भिक मागण्यासाठी तो संन्याशांच्या मठांकडे, ब्राह्मणांच्या वस्तीकडे, कुत्री, मांजरी, पक्षी ह्यांचा उपयोग न करतां आपली भिक मागेल. ५१
तो त्याचे डोक्याचे केस, नखे, दाढी, मिशा कापून आणि हातात कमंडलु घेउन सदैव भटकत व संयमात राहून कोणालाही न दुखवता राहील. ५२
तो धातूचे पात्र वापरणार नाही. तो जे पात्र वापरेल तो चिरलेले नसेल, त्याचे पात्र पाण्याने स्वच्छ केलेले असेल. जशी यज्ञाची भांडी असतात. ५३
मनु, स्वयंभूचा मुलगा, सांगतो, तो लाकडाचे कमंडलु, मातीची बशी व चिरलेल्या बांबूनी बनवलेली अशी संन्याशाची सामुग्री तो वापरेल. ५४
तो दिवसातून एकदा भिक मागण्यासाठी फिरेल. तो उगाचच जास्त भिक मिळावी म्हणून प्रयास करणार नाही. कारण, असें केल्याने त्याच्या वासना जागृत होण्याचा धोका असतो. ५५
लोकांच्या घरातील चुली विझल्या आहेत, खलबत्ता शांतपणे बाजूला ठेवला आहे, चुलीतील कोळसे विझले आहेत, सर्वांची जेवणे उरकलेली आहेत, ताट, वाटी स्वच्छ करून ठेवली आहेत, अशा निरवानिरवी नंतर संन्यासी भिक मागण्यासाठी निघेल. ५६
काही मिळाले नाही म्हणून तो दुःखी होणार नाही. जास्त मिळाले म्हणून खुष होणार नाही. तो फक्त गरजेपुरते मिळवेल आणि जे मिळेल त्यावर संतुष्ट होईल. ५७
लोकांनी आनंदाने सन्मानपूर्वकपणे जर भिक दिली तर ती त्याने घेऊ नये कारण, अशा भिकेत मोह दडलेला असतो. अशा मोहाचा त्रास मोठमोठ्या संन्याशांना झालेला आहे. नेहमी अनोळखी सज्जन गृहस्थाकडून भिक घ्यावी. ५८
थोडे गरजेपुरते खाऊन मग उभ्याने अथवा बसून तो एकांतात ध्यानासाठी बसेल. कोणत्याही मोहापासून मुक्त होण्यासाठी तो असें करेल. ५९
सर्व वासनांचा त्याग करून प्रेम व द्वेष अशा कोणत्याही वृत्तीच्या आहारी न जाता तो कोणालाही शरीराने अथवा मनाने इजा करणार नाही. असा संन्यासी अमरत्व प्राप्त करतो. ६०
तो पाप करणार्या लोकांच्या, जे नरकात व यमलोकात होणार्या दशेची प्रचिती घेईल. त्यांच्या हालांचा अनुभव घेईल. ६१
लोभ व मोह ह्यात अडकल्यामुळे त्यांचे प्रियजनांपासून विरह होणे, अयोग्य लोकांशी होणारे नाते, त्यामुळे त्यांचे होणारे नुकसान वृद्धत्वाचे आजार, शरीराचे होणारे हाल हे सर्व तो पाहिल व त्यातून तो कांहीं शिकेल, ६२
मृत्यूनंतर आत्म्याचे दुसर्या गर्भात प्रवेश करणे, आणि त्या आधीच्या मधल्या काळात त्या आत्म्याचा अनेक योनींतून होणारा प्रवास ६३
पापकर्मामुळे होणारा शरीराला त्रास, आणि पूण्यकर्मामुळे मिळणारे अवीट सुख ६४
हे सर्व तो ध्यानाच्या मदतीने अनुभवू शकतो. आत्म्याचे सुक्ष्मरूप तो पहातो, त्या स्वयंभूचे सर्व चराचरातील (उच्च, नीच) अस्तित्व तो ध्यानाच्या मदतीने अनुभवतो. ६५
तो ज्या कोणत्या शाखेचा (तत्त्वज्ञानाची) उपासक (पुरस्कर्ता) असो, त्याचे महत्व रहात नाही. त्याने सर्व चराचरांबद्दल सम बुद्धि ठेवून संयमाने राहून साधना करावयाची असते. ६६
कटक झाडाच्या फळांनी पाणी निवळ होते तरी त्या फळाच्या केवळ उल्लेखाने पाणी स्वच्छ होत नाही. ६७
जीवंत प्राण्यांना मदत करण्यासाठी तो संन्यासी, रात्रंदिवस जरी स्वताला वेदना होत असल्या तरी जमीन न्याहाळत प्रवास करीत राहील. ६८
अनवधानाने जर संन्याशाने निरपराध प्राण्याला इजा केली असेल तर तो आंघोळ करून सहा वेळा प्राणायाम करील. ६९
नियमानुसार त्याने तीन वेळा दीर्घ प्राणायाम करावा. व्यार्हीती मंत्र आणि ओम उच्चारणे ही उच्च दर्जाची तत्त्वशिलता जी ब्राह्मणांस उचित आहे ती तो आचरणात ठेवील. ७०

मनुस्मृतीचा सहावा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com
आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी


सोमवार, ९ जानेवारी, २०१७

हिंदू कोण – १३

. देवांच्या अस्तित्वा बाबत
१९. फार प्राचीन काळी कदाचित ही दैवते माणसाला प्रत्यक्ष दर्शन देत होती तो कदाचित सत्ययुगाचा काळ होता त्यातून अनेक दंतकथा जगाच्या पाठीवरील सर्वच मानव समाजांत रुढ झाल्याचे आढळते. अघोर तंत्रात असें दिले आहे किं, आपल्याला जशी भुक लागते आपण खाद्य पदार्थ खातो त्याप्रमाणे, ह्या विविध दैवतांनासुद्धा भुक लागते पण ती खाद्य पदार्थांची नसते तर ती असतें भक्तिची. माणसाची दैवताबद्दलची भक्ति हेंच त्यांचे खाद्य असतें. म्हणूनच अशी म्हण आहे, "देव भावाचा भुकेला". असें सांगतात कीं, देवाकडे दोन गोष्टी नाहीत त्या तो माणसाकडून अपेक्षित असतो. एक आहे भक्ति दुसरी आहे दानत (देण्याची इच्छा). त्यासाठी देवाला प्रसन्न करावयाचे असेल तर माणसांने देवाला भक्ति द्यावी प्रसाद देऊन देण्याची दानत सिद्ध करावी. प्रसाद म्हणून जे भक्त देतो ते सर्व देवानेच उत्पन्न केलेले असते मग ते देवाचेच देवाला देण्यात काय हशिल? असा प्रश्र्न विचारला जातो. येथे देण्याची दानत देव पहात असतो असे समजले जाते. गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात किं, त्याला फळ, फुल अथवा कांहींच नसेल तर पाणी देऊन पुजा करावी, ह्याचा अर्थ, काय दिले ते महत्वाचे नसते तर देण्याची दानत सिद्ध करणे महत्वाची असते.
२०. सुरुवातीच्या काळांत माणूस साधी याचना करीत होता पण कालांतराने त्यात दैवतांची स्तुती इत्यादि गोष्टींचा समावेश होत गेला. त्यामुळे ही याचना करण्याची पद्धत अधिक गुंतागुंतीची व्यापक होत गेली. ही व्यापक गुंतागुंतीची आराधना करणे सामान्य माणसांस जेव्हां जमेनासे झाले तेव्हा ती गुंतागुंतीची पुजा करण्यासाठी त्यातील तज्ज्ञ आवश्यक झाले, आणि ते करणारा तज्ज्ञ असा पुरोहित वर्ग समाजात तयार झाला. हे असें पृथ्वीवरील सर्वच मानव समाजांत होत होते त्यानुसार निरनिराळे धर्म त्या त्या धर्मांचे पुरोहित तयार झाले. पौरोहित्य हा एक व्यवसाय म्हणून यथावकाश विकसित होत गेला. इतिहासात जर आपण पाहिले तर निरनिराळ्या समाजांत हे पुरोहित कशाप्रकारे आपले अधिराज्य स्थापून राहिले आहेत ते दिसते. ह्या पुरोहित लोकांने म्हणजे हल्लीच्या ब्राह्मण लोकांनी धर्माचा धंदा करून सर्व समाजावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. वस्तुतः ह्या पुरोहितांनासुद्धा परमेश्र्वराची खरी माहिती नसतांना ते साध्याभोळ्या लोकांना आपल्या कल्पनेचा देव सांगून वेळ मारून नेत असतात. सामान्य माणूस सुद्धा कांहीसा भावुक असतो तसांच तो थोडा आळशीसुद्धा असतो, त्याला त्याचे काम व्हावे ह्याची घाई झालेली असते, त्याचा गैरफायदा ब्राह्मणांनी घेण्यास सुरुवात केली देवाची पुजा करावयाची म्हणजे ती पुजार्याकडूनच झाली पाहिजे असें नियम करून त्या सामान्य माणसांस पुरते ताब्यात घेतले. हे सर्व आपण सगळे जाणून आहोतच. माणसाच्या जीवनांत अडीअडचणी येतच असतात त्यामुळे हा धर्माचा धंदा जगांतील सर्वच धर्मांत फोफावलेला दिसत आहे. त्याला हिंदू धर्म कसा अपवाद असणार?
देव दयाळु, कृपाळु, क्षमाशिल असतो, त्याला आळवणी करून आपली कामे करावीत असा अपप्रचार ह्या धंदेवाईक ब्राह्मणांनी त्यांचा धंदा चांगला चालावा म्हणून वाढवत नेलेला आपण पहातो आहोत. जर देव दयाळु, कृपाळु, क्षमाशिल नसून तो कठोर शिस्त पाळणारा प्रसंगी शिक्षा करणारा आहे असें सांगितले तर आपला धंदा बंद होईल ह्या भितीपोटी हे धंदेवाईक पुजारी, लोकांना परमेश्र्वराची अथवा ईश्र्वराची चुकीची प्रतिमा दाखवत राहिले. येशुदेवांने मात्र त्याच्या शिकवणीत परमेश्र्वर शिक्षा करतो असें सांगितले होते पण ते त्या धर्माच्या पुरोहित वर्गांने दुर्लक्षून, देव माफ करतो, असा अपप्रचार करणे चालूच ठेवले हे कॅथोलिक पंथाच्या इतिहासाच्या अभ्यासात दिसून येते. ख्रिस्ती धर्मात येशुची शिकवणूक चर्चची शिकवणूक ह्यातील फरक पहाता एकाद्या धर्माचा पुरोहितवर्ग त्या धर्माच्या मुळ शिकवणूकीत कसा ढवळाढवळ करतो मुळ शिकवणूक कशी बाजूला करतो ते समजते. हेंच इस्लाम बाबतसुद्धा झाल्याचे आढळून येते. हिंदूंतील ब्राह्मण त्याला अपवाद नाहीत. हिंदू कोण पुस्तकाच्या दुसर्या भागात हे सविस्तरपणे पहावयाचे आहे.

क्रमशः चालू –
मनुस्मृतीचा सहावा भाग सुरू ३१ – ५०
अशारितीने जो ब्राह्मण आपल्या ऐहीक देहाचा त्याग करतो तो ब्रह्मात विलीन होतो. त्याला दुःख व भिती कधीही त्रास देत नाहीत. ३२
अशारितीने जर तो वानप्रस्थाश्रम पार करू शकला तर तो चौथ्या म्हणजे संन्यासाश्रमात प्रवेश करील. त्या अवस्थेत त्यांनी सर्व ऐहीक बंध तोडलेले असतील. ३३
तो यज्ञयाग करून, दान देऊन, जेवणे देऊन व घेवून शेवटी कंटाळलेला असतो. तो संन्याशी शेवटी मृत्यूत आनंद प्राप्त करतो. ३४
जसे त्या ब्राह्मणाने तीन ऋण फेडली तसें तो मोक्षासाठी योग्य झाला व ज्याने ती तीन ऋणं नाही फेडली तो रसातळाला गेला असें समजावे. ३५
वेदांचा अभ्यास करणे, पुत्राला जन्म देणे व यज्ञयाग करणे जसें शास्त्रात दिले आहे तसें आपल्या कुवतीनुसार करणे ही तीन ऋणं जो पूर्ण करतो तो मोक्षाच्या मार्गाने जाण्यास योग्य ठरतो. ३६ टीपः ब्राह्मण धर्मात ही तीन ऋण दिली आहेत परंतु, हिंदू धर्मात मातृऋण, पितृऋण व समाज ऋण अशी तीन ऋण सांगितली आहेत.
जो द्विज ही तीन ऋण न फेडता मोक्षासाठी प्रयत्न करतो त्याला त्यात यश मिळत नाही. ३७
जगाचा कर्ता प्रजापति त्यासाठी ज्याने ईष्टी विधी जो प्रजापतिला अतिप्रिय, केला तो सर्व ऐहीक मालमत्तेचा त्याग करून आणि अग्निहोत्र स्वतामध्ये सामावून घरातून निघून जातो तो खरा संन्याशी ठरतो. ३८
सर्व विश्व ज्याच्या तेजांने पूर्ण असें त्याच्यात सामावलेले असते, तो वेदातील ऋचा स्मरत असतो आणि रहात्या घराचा तो त्याग करतो, त्याने सर्व जगाच्या भल्याचाच विचार केलेला असतो. ३९
ज्या द्विजांने त्याच्या आयुष्यात कधीही कोणाला त्रास दिला नाही तो मृत्यूनंतर अभय प्राप्त करून रहातो. ४०
शुद्धीच्या सर्व सामुग्री घेऊन तो गरातून निघून जातो, शांतपणे भटकत रहाते, तो कोणाहीकडून सुख देणार्या गोष्टी स्वीकारणार नाही. ४१
तो अंतिम मोक्षाचा मार्ग गाठण्यासाठी नेहमी एकटाच भटकत राहील, त्या गोष्टीची पूर्ण जाणीव ठेवून तो फिरत राहतो किं, एकट्यानेच अंतिम मोक्षाचा मार्ग मिळतो. तो कांहीं धरून ठेवत नाही कां कांही सोडत नाही. ४२
तो घराची किंवा अग्नीची अभिलाषा ठेवत नाही. तो गांवांत जाईल ते फक्त शिधा मिळवण्यासाठी. बाकी कशाचीही तो अपेक्षा करणार नाही. मोक्षाशिवाय कशाचाही विचार त्याला शिवणार नाही. सदैव ब्रह्माच्या ध्यानात राहील. ४३
मोक्षाची प्राप्ती झालेल्या संन्याशाचे रुप, हातात शिधा घेण्यासाठी खापरी असेल, रहाण्यासाठी मोठ्या वृक्षाची मुळं असतील व अंगावर जीर्ण फाटलेली वस्त्र असेल. ४४
तो मृत्यूची वाट पहात नसेल. तो जगण्यासाठी उत्सुक नसेल. तो केवळ अंतिम बुलाव्याची आस धरून वाट पहात असेल, जसा नोकर पगाराची वाट पहात असतो. ४५
तो पावले पाहून टाकतो, तो पाणी गाळून पितो. तो शब्द खरे बोलतो. तो हृदयात प्रामाणिकपणा ठेवतो. ४६
कोणी त्याला कटू बोलले तर ते तो मनाला लावून घेत नाही. तो कोणाला उलट उत्तर देणार नाही. तो कोणाशीही कशाही नश्वर कारणासाठी शत्रुत्व करणार नाही. ४७
तो रागावलेल्या माणसावर रागावणार नाही. त्याला कोणी वाईट बोलले तर तो त्या बद्दल चांगलेच बोलेल. तो फार कमी पण खरेच बोलेल. ४८
तो आत्मानंदात राहतो, योगमुद्रेत तो बसेल, कोणत्याही बाह्य मदतीशिवाय तो त्याच्या इंद्रीयांच्या सुखाचा त्याग करून स्वताच्याच संगतीत राहून जगेल. ४९
शुभाशुभांचे भविष्य सांगून, चमत्काराची प्रचिती देऊन अथवा ज्योतिष सांगून अथवा हस्तसामुद्रीक पाहून, शास्त्र समजावून, सल्ला देऊन, अशा कोणत्याही गोष्टींचा उपयोग न करतां तो केवळ भिक मागून जगेल. ५०
मनुस्मृतीचा सहावा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी