सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

हिंदू कोण – ३४

. चार वर्णांची माहिती - पुढे चालू

५१. स्त्री हा समाजातील अर्धा भाग ह्या वर्ण व्यवस्थेत सुरुवातीपासून दुर्लक्षिला गेला आहे. वैदिक काळात स्त्रीस विशेष स्थान होते असे सांगतात पण ब्राह्मण काळात तिची परवड झालेली आपण पहात आहोत. चार वर्ण, पुरुष प्रधान समाज व्यवस्थेचे द्योतक आहे अर्थात् त्यात स्त्रीकडे दुर्लक्ष होणे अपेक्षित आहे. वस्तुतः स्त्री ह्यात कोठेही बसत नाही म्हणून तिला मनुस्मृतीत शुद्राचा दर्जा देऊन तिचा घोर अपमान केलेला आहे. विज्ञान युगात हिंदू विचारात सुधारणा करून स्त्रीचा वेगळा वर्ण समाजाने मान्य केला पाहिजे. मी त्याला मातृवर्ण असें नांव दिले आहे. जर असा बदल हिंदूधर्माच्या व्यवस्थेत केला गेला तर आणि तरच स्त्रीयांवरील अन्याय दूर होईल, केवळ कायदे करून हे साध्य होईल असे वाटत नाही, असो. फलज्योतिष्यात, जातक स्त्री असली तरी अबकहडा चक्रात तिचा वर्ण दिलेला असतो. निदान तोच स्वीकारून त्या प्रमाणे तिचा वर्ण ठरवला गेला पाहिजे मग तिची जात कांहीही असो, असे ठरवले तरी स्त्रीवरील अन्याय कमी होईल. त्यासाठी जन्मणार्या प्रत्येक बालकाची जन्मपत्रिका तयार करण्याची कायदेशीर तरतुद प्रसुती गृहात असावी तसा, नियम करावा लागेल. त्यातून वैदिक काळातील गुणकर्मविभागशः वर्ण व्यवस्था पुनः प्रचारात आणता येईल.
क्रमशा पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू ८१ -९१
जे साक्षीदार खरी साक्ष देतील ते येथे ह्या जगात व मेल्यानंतर अत्यानंदाचा अनुभव घेतील आणि त्यांचा सन्मान ब्राह्मण करतील. ८१
जे साक्षीदार खोटी साक्ष देतील ते येथे ह्या जगात व मेल्यानंतर तडफडत रहातील म्हणून हे होऊ नये ह्यासाठी खरीच साक्ष देतील. ८२
सत्य वचनामुळे साक्षीदाराची शुद्धी होईल, त्याचे पुण्यबळ वाढेल, हे सर्व वर्णाच्या लोकांबाबत सारखेच योग्य असते. ८३
न्यायाधीश पुढे साक्षीदाराला आवाहन करील, आत्म्याचा साक्षीदार आत्मा असतो, स्वताच्या आत्म्याची प्रतारणा करू नका ज्यामुळे तुमच्या आत्म्यास दुःख होईल. तुमचा आत्मा तुमच्या बर्या वाईट कृत्यांचा साक्षीदार असतो हे लक्षात ठेवून काय ते करे सांगा. ८४
दुर्जन असें समजतात कीं, त्यांना कोणीही पहात नाही. परंतु, देव सर्वकांहीं पहात असतो तेसुद्धा तुमच्या आत्म्याच्या द्वारा. ८५
हे आकाश, ही पृथ्वी, हे पाणी, सर्व पुरुष त्यांच्या हृदयात, हा चंद्र, हा सूर्य, अग्नी, यमदेव, वारा, रात्र, संधीप्रकाश आणि न्यायदेवता असें सर्व मर्त्य लोकांच्या प्रवृत्ती चांगल्या ओळखतात. ८६
असें बोलून झाल्यावर न्यायाधीश स्वताचे शुद्धीकरण करून दुपारच्या प्रहरी द्विज साक्षीदार जे सुद्धा शुद्ध झाले आहेत, उत्तरेकडे अथवा पूर्वेकडे तोंड करून देवदेवतांच्या साक्षीने साक्षीच्या कामास सुरुवात होईल. ८७
पहिली साक्ष ब्राह्मणाची होईल, न्यायाधीश विचारेल बोला, जर क्षत्रिय साक्षीदार असेल तर बोलेल, खरे बोल, वैश्य साक्षीदार तर तो त्याला दटावण्याच्या अविर्भावात आज्ञाकरण्याच्या शब्दात विचारेल, तुझ्या धन्याची व मालमत्तेची शपथ घेऊन सांग, जर शुद्र असेल तर धमकीच्या शब्दात आज्ञा करील, खरे सांगून टाक नाहीतर तुझा नाश होईल. ८८
न्यायाधीश शुद्राला ताकीद देईल, ब्राह्मणाची हत्त्या केल्यास ऋषीमुनीनी जे शिक्षेचे स्थान निश्र्चित केले आहे. स्त्री किंवा मुलं ह्यांची हत्त्या केल्यास, विश्र्वासघात केल्यास, निमकहराम माणसांस जी शिक्षा होते ती तुला होईल, जर तू खोटे बोललास तर. ८९
चांगल्या लोकांस चांगले काम केल्यास जी फळं मिळतात ती तुम्हाला मिळतील व खोटे बोललात तर मात्र कुत्र्याच्या मोलांने तुमची अवस्था होईल. ९०
तुम्हाला असें वाटत असेल कीं, तुम्ही एकटे अहात तर तो तुमचा गैरसमज आहे कारण, एक गोष्ट लक्षात असूं द्या कीं, तुमच्या सगळ्या चांगल्या वाईट कामांचा साक्षीदार तुमच्या हृदयात बसलेला आहे. ९१

पुढे क्रमशः चालू -

मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा