सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

हिंदू कोण – ३८

इंनटरनेटच्या अडचणीमुळे पाेस्ट करू शकलाे नाही त्याबद्दल क्षमस्व

मागील भागातून पुढे
. सत्य, असत्य व हित, अहित ह्याचा पाप-पुण्य संबंधातील विचार –

५६. सत्य काय व असत्य काय ह्यावर हिंदूंच्या परंपरेत कोणती माहिती आहे ते पहावयाचे आहे. सत्य म्हणजे काय? एकदा हिंदू तत्त्वज्ञानात हे जग माया म्हणजे भ्रम आहे असें सांगितले जाते व माया म्हणजेच भ्रम म्हणजे खोटे अथवा असत्य आहे असें समजत असतांना दुसर्या वेळी त्यात सत्य पहाण्याचा प्रयत्न करणे कितपत योग्य होईल असा प्रश्र्न उभा रहातो. ह्याचा अर्थ जे सत्य ह्या जगात असते ते असत्यातील सत्य अथवा सापेक्ष सत्य असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्याला आपण सत्य समजतो ते फक्त कोणत्या तरी एका दृष्टीने सत्य असू शकते व इतर दृष्टीने तेंच असत्य असू शकते. ते कधीही पूर्ण सत्य नसते हे लक्षात घेतले पाहिजे. सांख्य तत्त्वज्ञानाचा हा गाभा आहे. असे असले तरी सर्वच धर्मांत, सत्य बोला असें सांगतात. हिंदूंतील अनेक ग्रंथांतसुद्धा सत्याचा आग्रह धरा असे सुचवलेले असते. असें असले तरी आपण आपल्या आयुष्यात बहुतेक प्रसंगी खरे बोलण्यापेक्षा खोटेच बोलणे जास्त पसंद करतो असा सर्वांचा अनुभव आहे. अशारितीने खोटे बोलण्यामुळे पाप लागते कां? हे बघावे लागेल. असा अनुभव आहे किं माणूस कोणाच्या तरी हितासाठी खोटे बोलत असतो. येथे हिताचा विचार महत्वाचा असतो. आता प्रश्र्न उत्पन्न होतो किं, कोणाचे हित?
आदिशंकराचार्यांनी त्यांच्या टीकांत "ब्रह्म सत् जगन् मिथ्या", असें लिहीले आहे. येथे ब्रह्म म्हणजे परमेश्र्वर असा अर्थ घ्यावयाचा आहे. त्याप्रमाणे, परमेश्र्वर हेंच केवळ सत्य आहे व हे जग म्हणजे निसर्ग खोटा आहे. असे त्यांनी सांगितले आहे. परंतु, आपल्या दैनंदिन व्यवहारात मात्र सत्य वेगळे असते. ते सत्य व शंकराचार्यांचे सत्य ह्यांत कांहींच संबंध नाही. त्यामुळे वरील विधान प्रथम दर्शनी अग्राह्य ठरते. येथे मुद्दा असतो काय केल्याने पाप लागणार नाही. कारण, पापमुक्त जीवन हा माणसाच्या जीवनातील महत्वाचा मुद्दा असतो. जर व्यवहारात आपण सत्य सांगितले व त्यामुळे जर पाप होणार असेल तर ते सत्य पापकारक असल्यानें अग्राह्य ठरते. म्हणजे येथे सत्य कीं असत्य हे कमी महत्वाचे असते, पापकारक कीं, पुण्यकारक, हे महत्वाचे असते. येथे हित व अहित हे सत्य व असत्याशी संबंधित आहेत व ते कसे ते पहावे लागेल. त्यासाठी एक रुपक कथा उपनिषदात दिले आहे ती पाहूया.
५७. एक सज्जन एका चार रस्त्यांच्या नाक्यावर उभा आहे व अशा परिस्थितीत तो, एक स्त्री समोरून धांवत येतांना पहातो. ती स्त्री लगबगीने उजव्या फाट्याने पुढे निघून जाते. त्यानंतर थोड्याच अवधींनी दोन धटींगण पुरुष समोरून येतांना तो पहातो. तो समजतो किं, हे दोघे त्या स्त्रीचा पाठलाग करीत आहेत. नाक्यावर आल्यावर ते आजुबाजूस पहातात परंतु, त्यांना ती बाई कोठेही दिसत नाही. त्यानंतर ते ह्या सज्जनास विचारतात, ती बाई कोठे गेली?
आता सज्जनांस प्रश्र्न पडतो, सत्य बोलावे कीं, असत्य? जर सत्य सांगितले तर ती स्त्री मोठ्या अडचणीत पडणार व त्याचे पातक ह्या सज्जनांस लागणार व जर असत्य सांगितले तर असत्य बोलण्याचे दुषण लागणार. येथे आड व तेथे विहीर अशी परिस्थिती झाली आहे, अशा प्रसंगी काय सांगणे जास्त श्रेयस्कर हे पहावयाचे आहे. ह्या ठिकाणी त्या सज्जनांने ती स्त्री डावी कडे गेली, असे मानेने दाखवून, असत्य सांगून त्या स्त्रीचे संरक्षण केले.
ह्या कथेत जे घटक गुंतलेले आहेत ते नीटपणे पहावे लागतील. असत्य सांगूनही तो सत्य सांगत होता असे समजावे लागते कारण, ते असत्य चांगुलपणाचे समर्थन करणारे होते. ह्याचा अर्थ हिंदूंच्या विचारसरणी नुसार चांगुलपणा म्हणजेच सत्य असे मानले जाते. कारण, त्यामुळे परमेश्र्वर त्याच्याकडे अनुकूल होतो. म्हणजे चांगुलपणा परमेश्र्वराचे द्योतक आहे तर, चांगुलपणा कोणाशी? किती? असें प्रश्र्न उपस्थित होतात. त्याची चर्चा ह्या पुस्तकाच्या दुसर्या भागात प्रश्र्नोत्तर परिशिष्टात केली आहे.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – -
वासनेच्या आहारी जाऊन खोटी साक्ष दिली तर त्याला हजारपट दंड पडेल, रागांने खोटी साक्ष दिल्यास तिप्पट, अज्ञानामुळें दिल्यास दोनशे अमर्समण, पोरकटपणाने दिल्यास शंभर अमर्समण असें दंड असावेत. १२१
न्याय व्यवस्थेबाबत जरब रहाण्यासाठी व तिची गरीमा राखण्यासाठी असें दंड खोटी साक्ष देणार्यास आवश्यक आहेत असें मनु सांगतो. नाहीतर न्याय देणे केवळ अशक्य होईल. १२२
चांगला न्यायी राजा खोटी साक्ष देणार्या ब्राह्मणास फक्त बहिष्कृत (देश सोडण्यास सांगेल) करील परंतु, इतर तीन वर्णातील असेल तर त्याला दंड व बहिष्कार अशा दोनही शिक्षा असाव्यात. १२३
स्वयंभूचा मुलगा मनु असें सांगतो किं, दहा जागा आहेत जेथे खोटी साक्ष देणार्या इतर तीन वर्णाच्या माणसास शिक्षा व्हावी, ब्राह्मणाला फक्त देश सोडून देण्यास सांगितले जाईल. १२४
त्या जागा आहेत, पोट, जिव्हा, दोनही हात, दोनही पाय, डोळे, नाक, दोनही कान, आणि सर्व शरीर. १२५
राजा गुन्ह्याचे गांभिर्य, उद्देश, काळवेळ, गुन्ह्याची जागा, अशा सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून शिक्षेचे स्वरुप व कोणत्या अवयवावर करावयाची ते ठरवेल. १२६
अन्यायकारी निकाल झाला तर राजाची प्रजेत नाचक्की होईल, त्याचा सन्मान रहाणार नाही, मृत्यूनंतर त्याला अधोगती प्राप्त होईल म्हणून असें होणार नाही ह्याची दक्षता राजांने व न्यायाधीशांनी, न्यायालयातील ब्राह्मणांनी अशा सर्वांनी घ्यावयाची असते. १२७
जो राजा निरपराध माणसाला अविचाराने शिक्षा करतो व दुर्बुद्धीमुळें गुन्हेगारास मोकळे सोडतो तो राजा ह्या जगात कायम बदनाम होतो व मृत्यू पश्र्चात रसातळाला जातो. १२८
पैशाच्या फसवणूकी बाबत पहिला गुन्हा असेल तर त्याला ताकीद देऊन सोडावे, पुन्हा केल्यास दम द्यावा व सोडून द्यावे त्यानंतर पुन्हा केला तर मात्र दंड करावा न त्यानंतर पुन्हा तो करीत राहीला तर त्याला कठोर शिक्षा करावी. १२९
एवढे करूनही तो सुधारला नाही तर त्याला ह्या सगळ्या शिक्षा एकत्रितपणे द्याव्यात. १३० टीपः ह्या सर्व शिक्षा एकत्रितपणे कशा द्याव्यात ते सांगितलेले नाही.
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा